Mohammad Azharuddin हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या (HCA) राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममधील (Rajiv Gandhi International Cricket Stadium) नॉर्थ पॅव्हिलियन स्टँडवरून माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन यांचे नाव हटवण्याच्या आदेशाविरोधात अझहरुद्दीन आता तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.
या निर्णयामागे HCA चे नीतिनियम अधिकारी आणि ओम्बड्समन न्यायमूर्ती (निवृत्त) व्ही. ईश्वरय्या यांचा आदेश आहे. ‘लॉर्ड्स क्रिकेट क्लब’ या सदस्य युनिटने दिलेल्या याचिकेनुसार, 2019 मध्ये अझहरुद्दीन यांनी अध्यक्ष असताना गैरप्रकार करून स्टँडवर स्वतःचे नाव दिले, असा आरोप आहे. सामान्य सभेची कोणतीही अधिकृत मंजुरी न घेता हा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.
“मी नक्कीच न्यायालयाचा आधार घेणार आहे. एका भारताच्या कर्णधाराचे नाव काढून टाकणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे,” असे अझहरुद्दीन यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.
तसंच, ओम्बड्समनचा कार्यकाळ फेब्रुवारी 2025 मध्येच संपला असून, त्यानंतर दिलेला कोणताही आदेश अवैध आहे, असाही दावा अझहरुद्दीन यांनी केला आहे.
“त्यांना AGM मध्येच मुदतवाढ मिळू शकते, पण AGM अजून झालीच नाही,” असंही ते म्हणाले.
Mohammad Azharuddinचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप
क्रिकबझच्या (cricbuzz) अहवालानुसार, 2019 ते 2023 या कालावधीत HCA चे अध्यक्ष असलेल्या अझहरुद्दीन यांनी आरोप केला की, “मी अध्यक्ष असताना भ्रष्टाचार रोखला, त्यामुळे आता सूड उगवला जात आहे. जे लोक कधी बॅटसुद्धा हातात घेतले नाहीत, ते आता माझ्यावर बोट दाखवत आहेत.”
याशिवाय, VVS लक्ष्मण यांचे नाव हटवल्याच्या आरोपांचाही त्यांनी इन्कार केला. “लक्ष्मण यांचे नाव अजूनही तिथेच आहे. जाऊन स्वतः बघा,” असे त्यांनी स्पष्ट केले.
HCA अध्यक्षांवरही टीका
सध्याचे HCA अध्यक्ष जगन मोहन राव यांच्यावरही अझहरुद्दीन यांनी जोरदार टीका केली.
“खेळाडूंना आदर न देता व्यवस्थापन गोंधळात चालले आहे. ही अपमानास्पद वागणूक मी सहन करणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. HCA Controversy