हनीमूनसाठी स्विट्झर्लंड नाही जमलं, म्हणून काश्मीर गाठलं आणि… दहशतवाद्यांच्या गोळीने विनय नरवाल यांचे आयुष्य संपलं

Sourabh Patil

Vinay Narwal

Vinay Narwal काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam) मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam terror attack) हरियाणाच्या करनाल जिल्ह्यातील लेफ्टनंट विनय नरवाल (वय २६) यांचा मृत्यू झाला. फक्त पाच दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. नववधू हिमांशीच्या हातावरची मेहंदीही अजून उतरली नव्हती, आणि त्याआधीच दहशतवाद्यांनी तिचं कुंकू पुसलं. या घटनेने संपूर्ण देशभरात शोक आणि संतापाची लाट उसळली आहे.

हनीमूनसाठी स्विट्झर्लंड नाही जमलं, म्हणून काश्मीर गाठलं आणि…

विनय नरवाल (Vinay Narwal) हे भारतीय नौसेनेत अधिकारी होते आणि कोच्ची येथे तैनात होते. बी.टेक. झाल्यानंतर त्यांनी नौसेनेत प्रवेश घेतला होता. १६ एप्रिल रोजी त्यांचा विवाह हिमांशीसोबत पार पडला होता. हनीमूनसाठी त्यांनी स्विट्झर्लंडला जाण्याचा बेत आखला होता, पण वीजा न मिळाल्याने त्यांनी काश्मीरची निवड केली.

परंतु, या ‘स्वर्गभूमी’तच २३ एप्रिल रोजी बैसरन घाटीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा जीव गेला. छाती, गळा आणि हातावर गोळ्या झाडल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

“तो मुस्लिम आहे का?” – गोळी झाडण्याआधीचा थरारक क्षण

विनय यांची पत्नी हिमांशीने हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये ती म्हणते, “आम्ही फक्त भेलपुरी खात होतो… तेव्हा त्या बंदूकधाऱ्याने विचारलं – ‘तो मुस्लिम आहे का?’ आणि मग त्याला गोळी झाडली.” या क्षणांचे वर्णन करताना तिचा आवाज अश्रूंमध्ये हरवतो आणि देशवासीयांच्या हृदयाला चटका लागतो.

एकुलता एक मुलगा गमावले; आजोबांची पंतप्रधानांकडे मागणी

विनय नरवाल हे त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते अपत्य होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंब आणि गावात शोककळा पसरली आहे. विनयचे आजोबा हवा सिंह नरवाल यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. या संवादात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत एकच मागणी पोहचवली – “आमचं फक्त एकच आहे, दहशतवाद संपवावा.”

पुलवामानंतरचा सर्वात मोठा हल्ला; देश मागतोय बदला

२३ एप्रिल रोजी दुपारी बैसरन घाटीमध्ये झालेल्या गोळीबारात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. हे ठिकाण ‘मिनी स्विट्झर्लंड’ म्हणून ओळखलं जातं. या भ्याड हल्ल्याला TRF या पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनेने जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. पुलवामानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला मानला जात असून, केंद्र सरकार लवकरच दहशतवाद्यांविरोधात निर्णायक कारवाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विनय नरवाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली… देश तुमचं ऋण कधीच विसरणार नाही.

Leave a Comment