Rahuri Bomb भारत-पाकिस्तान सीमावर्ती तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या युद्धाच्या चर्चेला उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर सीमेवरील रणगाडे, फायटर जेट्स आणि नौदलाच्या सरावाचे व्हिडिओ दोन्ही देशांमधून व्हायरल होत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातल्या एका गावात (Varavandi village) घडलेली एक थरारक घटना सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
450 किलोचा जिवंत बॉम्ब वरवंडी गावात पडला होता, आणि तब्बल एक महिना तो तसाच पडून होता! 24 मार्च 2025 रोजी जेठ विमानातून हा बॉम्ब वरवंडी गावाजवळ पडला होता. हा बॉम्ब केवळ 4.5 फूट लांब आणि 453 किलो वजनाचा होता. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तो अजूनही ‘जिवंत’ होता — म्हणजेच, फुटण्याची शक्यता कायम होती.
प्रशासनाच दुर्लक्ष, गावकऱ्यांची चिंता
गावकऱ्यांनी तातडीने प्रशासनाला माहिती दिली होती, पण त्यानंतरही एक महिना लोटून गेला तरी कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. 28 मार्चला पाईपलाईन दुरुस्तीच्या कामादरम्यान हा बॉम्ब जमिनीत सुमारे सात फूट खोल आढळून आला. ही माहिती तलाठी ज्ञानेश्वर बेल्लेकर यांनी के. के. रेंज आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांना दिली.
Rahuri Bomb लष्कराने केली पाहणी, पण कारवाईसाठी लागला महिना
भारतीय लष्कर आणि वायुसेनेचे पथक घटनास्थळी (Rahuri) दाखल झाले. त्यांनी बॉम्बची पाहणी केली आणि तो जिवंत असल्याचे स्पष्ट केले. परंतु, तो हटवण्यासाठी दिल्लीतून परवानगी मिळेपर्यंत गावकऱ्यांनी दररोज भीतीच्या छायेत जीवन जगावं लागलं.
बॉम्ब अखेर निकामी
एक महिन्यानंतर, 1 मे रोजी पुण्यातील लष्कराच्या विशेष पथकाने बॉम्ब निकामी केला. घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. संपूर्ण परिसर एक किलोमीटरपर्यंत रिकामा करण्यात आला होता. बॉम्ब डिफ्यूज केल्यानंतर त्याला केके रेंजमध्ये नेण्यात आलं.
धोक्याच्या छायेत राहत होते गावकरी
या संपूर्ण काळात गावकरी सतत भीतीच्या छायेत होते. हा बॉम्ब जर फुटला असता, तर एक किलोमीटर परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असता. तीन ते चार किलोमीटरपर्यंत भूकंपासारखा धक्का बसला असता. इतकंच नव्हे, तर केवळ 500 मीटर अंतरावर नागरी वस्ती आणि मुळा धरण आहे — या दोघांनाही मोठा धोका होता.
प्रश्न अनुत्तरितच
हा बॉम्ब जेट विमानातून नक्की कसा पडला? लष्कर आणि प्रशासनाने त्वरित कारवाई का केली नाही? शेतकऱ्यांनी कळवल्यानंतरच हालचाल का झाली? — असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.
तुमचं काय मत आहे या सगळ्या प्रकरणावर? तुम्हाला काय वाटतं, प्रशासनाचं वागणं योग्य होतं का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा.