Missile attack in Kutch Gujarat भारत-पाकिस्तान सीमांवर तणाव वाढत असतानाच शनिवारी पहाटे गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात कमीत कमी सहा पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना भारतीय सुरक्षा दलांनी निष्क्रिय केल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिक नागरिकांनी आकाशात उडणारे ड्रोन पाहिले असून त्यांनी व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही ड्रोनचा स्फोट होऊन उडालेल्या अवशेषांचा शोध गावांजवळच लागला, जिथे पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा डाव
सूत्रांच्या माहितीनुसार, हे ड्रोन आणि क्षेपणास्त्र कच्छ जिल्ह्यातील लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून पाठवण्यात आले होते. जिल्हा पाकिस्तानच्या सीमेला लागून असल्यामुळे येथे सुरक्षेचा विशेष बंदोबस्त आहे.
रात्रीपासूनच संपूर्ण कच्छ जिल्ह्यात ब्लॅकआउट (वीजपुरवठा बंद) करण्यात आला होता. शनिवारी सकाळपासून बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत.
“ड्रोन आमच्या गावाजवळ कोसळले,” स्थानिक रहिवाशाची माहिती
अबडासा गावातील रहिवासी रज्जाक हिंगराजिया यांनी सांगितले की, “आज सकाळी उठल्यावर फोनमध्ये ड्रोनचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळाले. आमच्या गावाजवळच एक ड्रोन कोसळले.”
ते पुढे म्हणाले, “प्रशासनाने विनाकारण बाजारात न जाण्याचा इशारा दिला आहे. काल रात्री स्वतःहून ब्लॅकआउट पाळण्यास सांगण्यात आले होते, परंतु नंतर रात्री ९ वाजता वीज पुरवठा बंद करण्यात आला. वातावरण थोडं तणावपूर्ण आहे, पण आम्ही घाबरलेलो नाही.”
Missile attack in Kutch Gujarat 26 ठिकाणांवर हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न
शनिवारी सकाळी परराष्ट्र मंत्रालय व संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत विंग कमांडर व्योमिका सिंग व कर्नल सोफिया कुरेशी यांनी माहिती दिली की, “श्रीनगरपासून भुजमधील नलियापर्यंत पाकिस्तानने एकूण 26 ठिकाणांवर लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.”
प्रशासनाची नागरिकांना सूचना: घरातच थांबा
India Pakistan Tension तणाव वाढल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. अनावश्यक हालचाल टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कच्छ जिल्ह्यातील सद्यस्थिती अत्यंत सतर्क असून सैन्याने वेळेवर कारवाई करत संभाव्य मोठा धोका टाळला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन सरकारने केले आहे.