AI Centers in Maharashtra महाराष्ट्र शासनाने प्रशासनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढवण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. IBM टेक्नॉलॉजी इंडिया आणि महाराष्ट्र शासन यांच्यात नुकताच एक ऐतिहासिक सामंजस्य करार झाला असून, त्याअंतर्गत मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन प्रमुख शहरांमध्ये AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) केंद्रे उभारली जाणार आहेत.
हा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मंत्रालयात पार पडला. या उपक्रमामुळे राज्य शासनाच्या प्रशासनिक कार्यप्रणालीत आधुनिकता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यास मदत होणार आहे.
शासन व IBM यांची भागीदारी – कौशल्यविकासाला प्राधान्य
या AI केंद्रांमधून सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी यांना AI, सायबर सुरक्षेबाबत तसेच क्लाऊड तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. IBM च्या आघाडीच्या प्रशिक्षण प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे कौशल्यविकास कार्यक्रम राबवले जातील. प्रत्येक शहरात विशिष्ट उद्देशाने AI सेंटर्स उभारली जाणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. मुंबई मध्ये भौगोलिक विश्लेषणासाठी AI केंद्र उभारल जाईल. तसेच पुण्यामध्ये न्यायवैद्यकीय विज्ञानासाठी AI प्रकल्प साकारण्यात येईल. नागपूर मध्ये प्रगत संशोधन व MARVEL अंमलबजावणी तंत्रज्ञानासाठी केंद्र उभारलं जाणार आहे. या तिन्ही केंद्रांमुळे सार्वजनिक सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि नागरिक-केंद्रित होणार आहेत. Data Center in Maharashtra.
AI मॉडेल्सवरील हक्क राज्य शासनाकडेच
या उपक्रमात वापरले जाणारे AI मॉडेल्स, तांत्रिक नियंत्रण व डेटा सुरक्षेचे पूर्ण स्वामित्व महाराष्ट्र शासनाकडे राहील. जनरेटिव्ह AI, हायब्रिड क्लाऊड, ओळख व्यवस्थापन आणि सुरक्षित नागरिक प्रवेश प्रणाली या बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे.
MSME व खाजगी उद्योगांनाही मिळणार लाभ
या AI केंद्रांचा फायदा केवळ शासकीय यंत्रणेलाच नाही तर MSME (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग) तसेच खाजगी उद्योग क्षेत्रालाही मिळणार आहे. उत्पादनक्षमता, नवोन्मेष आणि स्पर्धात्मकतेत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
AI Centers उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, IT मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, IBM इंडिया चे MD संदीप पटेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
हा करार महाराष्ट्राच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.