Dilip Ghosh भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आता वयाच्या ६१व्या वर्षी विवाहबंधनात अडकणार आहेत. १8 एप्रिल रोजी न्यू टाऊन येथील त्यांच्या निवासस्थानी पारंपरिक व साध्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडणार आहे. बंगालच्या राजकारणात हा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
कोण आहे रिंकू मजुमदार?
दिलीप घोष यांची होणारी पत्नी म्हणजे रिंकू मजुमदार (Rinku Majumdar), या दक्षिण कोलकात्यातील भाजप महिला मोर्चाच्या सक्रिय नेत्या आहेत. दोघांची ओळख न्यू टाऊनमधील मॉर्निंग वॉकदरम्यान झाली होती. ही ओळख मैत्रीत, आणि आता विवाहात रूपांतरित होत आहे.
दिलीप घोष यांचा राजकीय काळात काहीसा पराभव झाल्यानंतर रिंकू यांनी त्यांना मानसिक आधार दिला होता. याच नात्याची सुरुवात रिंकू यांच्या लग्नाच्या प्रस्तावाने झाली होती. त्यांनी थेट दिलीप घोष यांच्या आई पुष्पलता घोष यांची भेट घेऊन संमती घेतली, आणि हे नातं अधिकृतरित्या पुढे नेण्यात आलं.
Dilip Ghosh यांच्यावर राजकीय शुभेच्छांचा वर्षाव
रिंकू मजुमदार या घटस्फोटित असून एका मुलाच्या आई आहेत. त्यांचा मुलगा सध्या कोलकात्यातील साल्ट लेक सेक्टर ५ मधील आयटी कंपनीत काम करत आहे. काही दिवसांपूर्वी त्या ईडन गार्डन्स येथे IPL सामना पाहताना दिसल्या होत्या, त्याचवेळी त्यांच्या आणि दिलीप घोष यांच्या नात्याची चर्चा रंगली होती.
हा विवाह कोणताही गाजावाजा न करता, फक्त जवळच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. कोणताही भव्य समारंभ आयोजित करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे तृणमूल काँग्रेससारख्या विरोधी पक्षातील नेत्यांनीही दिलीप घोष यांना शुभेच्छा दिल्या आहेत.