Maharashtra राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) अंतर्गत नव्या अभ्यासक्रम संरचनेनुसार महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता इयत्ता 1 ते 5 पर्यंतच्या वर्गांमध्ये मराठी व इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये हिंदी (Hindi language is a mandatory third language in maharashtra) ही तिसरी अनिवार्य भाषा म्हणून शिकवली जाणार आहे.
सध्या राज्यातील मराठी व इंग्रजी माध्यम शाळांमध्ये केवळ दोन भाषा – मराठी व इंग्रजी – अनिवार्य आहेत. मात्र, बुधवार (16 एप्रिल 2025) रोजी राज्य शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात शासन निर्णय (GR) जारी केला असून, त्यात NEP 2020 च्या शिफारशींनुसार टप्प्याटप्प्याने नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी कशी केली जाणार आहे, हे स्पष्ट करण्यात आले आहे.
या नव्या निर्णयानुसार सर्व शाळांमध्ये (मराठी आणि इंग्रजी माध्यम वगळता) आधीपासूनच त्रिभाषा पद्धत लागू आहे. आता मराठी व इंग्रजी माध्यम शाळांमध्येही इयत्ता 1 पासून हिंदी शिकवणं सुरू होणार असून, पुढील इयत्तांमध्ये ती टप्प्याटप्प्याने वाढवली जाणार आहे.
Maharashtra शालेय शिक्षणाची रचना 5+3+3+4 अशी असेल
NEP 2020 च्या अंतर्गत शालेय शिक्षणाची रचना 5+3+3+4 अशी असेल. यामध्ये पहिल्या पाच वर्षांमध्ये (3 वर्षे पूर्व प्राथमिक + इयत्ता 1 व 2) ‘Foundational Stage’, इयत्ता 3 ते 5 ‘Preparatory Stage’, इयत्ता 6 ते 8 ‘Middle Stage’, तर इयत्ता 9 ते 12 ‘Secondary Stage’ म्हणून विभागले जाणार आहे.
राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) वर आधारित असेल. मात्र, इतिहास, भूगोल व भाषा यांसारख्या विषयांमध्ये महाराष्ट्राचा स्थानिक संदर्भ ठेवण्यात येणार आहे.
शिक्षण क्षेत्रात सर्वसमावेशकता, समानता, गुणवत्ता, परवडणाऱ्या सुविधा आणि जबाबदारी या पाच मूलभूत स्तंभांवर शिक्षण प्रणाली उभारण्यात येत असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.