Free cashless treatment महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने राज्यातील अपघातग्रस्त नागरिकांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला असून, त्यांना आता 1 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार सुविधा दिली जाणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अपघात झाल्यानंतर तातडीने व दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कॅशलेस उपचारांची सुविधा वाढणार
राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरळी येथील मुख्यालयात झालेल्या बैठकीत आबिटकर यांनी स्पष्ट केले की, अपघातग्रस्त रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस सेवा दिली जाणार आहे. ही सेवा राज्यातील अंगीकृत व तातडीच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध असेल.
Free cashless treatment गैरप्रकार रोखण्यासाठी दक्षता आणि कारवाईचे निर्देश
आरोग्यमंत्री आबिटकर यांनी स्पष्ट सांगितले की, योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आणि रुग्णालयांनी विशेष दक्षता बाळगावी. तसेच योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अंगीकृत रुग्णालयांची संख्या वाढणार
या बैठकीत आयुष्मान भारत (Ayushman Bharat Yojana) आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा आढावाही घेण्यात आला. यावेळी आबिटकर यांनी अंगीकृत रुग्णालयांची संख्या सध्याच्या 1792 वरून थेट 4180 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. ही प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार आहे.
योजनेत अवयव प्रत्यारोपण, प्राथमिक आरोग्य सेवा, तसेच दरात सुधारणा यांचा समावेश करण्यासाठी अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती एक महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे.
मोबाइल अॅप व कार्ड वितरण प्रणाली सुलभ
योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. या अॅपद्वारे रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारी सहजपणे नोंदवता येणार आहेत. तसेच आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, रेशन दुकानदार आणि नागरी सेवा केंद्रांमार्फत आयुष्मान कार्डचे वितरण गतीने होणार आहे.