जातीय जनगणनेवरून भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; “नेहरूंमुळेच जातनिहाय आरक्षणाला विरोध”

Sourabh Patil

Caste Census

Caste Census जातनिहाय जनगणनेचा श्रेय घेण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नावर गुरुवारी भारतीय जनता पक्षाने तीव्र टीका केली. भाजपने (BJP) विचारले की, पूर्वीच्या काँग्रेस सरकारांनी अशी जनगणना का राबवली नाही? केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधत त्यांना “जातनिहाय आरक्षणाचे कट्टर विरोधक” म्हटले.

“1951 मध्ये कोणाची सत्ता होती?” – भाजपचा सवाल

प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना प्रधान म्हणाले, “काँग्रेस म्हणते ‘सरकार तुमची, पण सिस्टीम आमची’. मग 1951 मध्ये कोणाचं सरकार होतं? कोणती व्यवस्था होती? 1931 नंतर जातनिहाय जनगणना झालीच नाही. 1941 मध्ये भारत स्वतंत्र नव्हता. पण 1951 मध्ये सत्तेवर कोण होते? पंडित नेहरूच होते.”

ते पुढे म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी नसते, तर सामाजिक समवेदनशीलता राष्ट्रीय विषय ठरली नसती. घटनासभेच्या सल्ल्यामुळे आरक्षण आज अस्तित्वात आहे. पंडित नेहरू यांनी जातनिहाय आरक्षणाला केवळ शब्दांत नव्हे, तर प्रत्यक्षात विरोध केला. त्यांनी त्या काळातील मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहून आरक्षणामुळे गुणवत्ता घसरू शकते, असा इशारा दिला होता.”

काका कालेलकर समिती आणि मंडल आयोगावरून गांधी कुटुंबावर टीका

धर्मेंद्र प्रधान यांनी गांधी कुटुंबावरही टीका करत म्हणाले, “काका कालेलकर समितीचा अहवाल वर्षानुवर्षे दबवून ठेवला गेला. तेव्हा सत्ता कोणाकडे होती? त्यांच्या आजी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे. मंडल आयोग जनतेच्या सरकारने 1977 मध्ये स्थापन केला. त्या वेळी भाजप जनसंघच्या रूपात सरकारचा भाग होता.”

ते पुढे म्हणाले, “पण मंडल आयोगाचा अहवाल दशकभरासाठी का थांबवला गेला? सत्तेवर कोण होते? काँग्रेस! ही फक्त ढोंगबाजी आणि अहंकार आहे.”

राहुल गांधींच्या भूमिकेचं काँग्रेसकडून कौतुक

दरम्यान, काँग्रेसने जातनिहाय जनगणनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आणि त्याचे श्रेय राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सातत्यपूर्ण मागणीला दिले. “राहुल गांधी म्हणाले होते – मोजणी सुरू करा. आता मोदी सरकारने मोजणीची तयारी सुरू केली आहे,” असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले.

रमेश पुढे म्हणाले, “जातनिहाय जनगणना ही समाजाचं एक्स-रे आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. भाजपने त्यांचा उपहास केला, दुर्लक्ष केलं, पण आता हा निर्णय घेतल्यामुळे आम्ही म्हणतो – उशीर झाला तरी बरेच झालं!”

Caste Census जातनिहाय जनगणना का महत्त्वाची?

जातनिहाय जनगणना म्हणजे राष्ट्रीय जनगणनेदरम्यान नागरिकांच्या जातीची नोंद घेणे. भारतात जात ही सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनावर मोठा प्रभाव टाकते. त्यामुळे अशा जनगणनेतून मिळणारी माहिती विविध गटांच्या आर्थिक-सामाजिक स्थितीचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त ठरते.
ब्रिटिश राजवटीत 1881 ते 1931 पर्यंत ही प्रक्रिया नियमितपणे केली जात होती. मात्र, 1951 नंतर स्वतंत्र भारतात केवळ अनुसूचित जाती आणि जमातींचीच गणना सुरू राहिली.

जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा एकदा देशाच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Caste Census: BJP attacks Congress. Opposition to caste-based reservation is because of Nehru

Leave a Comment