Suryakumar Yadav टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू सूर्यकुमार यादव सध्या IPL 2025 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आयपीएलच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे – सलग 11 सामन्यांमध्ये किमान 25 धावा करणारा पहिला फलंदाज ठरण्याचा मान त्याने पटकावला आहे.
1 मे रोजी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात, सूर्याने फक्त 23 चेंडूंमध्ये नाबाद 48 धावा करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार होते, तर स्ट्राइक रेट होता तब्बल 208.69.
या खेळीमुळेच त्याने आयपीएलच्या सलग 11 सामन्यांमध्ये किमान 25 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला.
रॉबिन उथप्पाचा विक्रम मोडला
या आधीचा विक्रम रॉबिन उथप्पाच्या नावावर होता, ज्याने 2014 साली कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना सलग 10 सामन्यांमध्ये 25+ धावा केल्या होत्या. मात्र आता सूर्यकुमार यादवने हा विक्रम मागे टाकत आयपीएलमध्ये नवा अध्याय लिहिला आहे.
Suryakumar Yadav ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर
सध्या सूर्यकुमार यादव आयपीएल 2025 मध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याने 11 सामन्यांमध्ये 67.85 च्या सरासरीने 475 धावा केल्या आहेत, ज्यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
त्याचा आतापर्यंतचा सर्वोत्तम आयपीएल हंगाम 2023 मध्ये होता, ज्यात त्याने 605 धावा केल्या होत्या. यंदा तो आपल्या त्या विक्रमालाही मागे टाकण्याच्या तयारीत आहे आणि त्याला केवळ 126 धावांची गरज आहे.
टी20 वर्ल्ड कपपूर्वी सूर्या ‘सुपरफॉर्म’मध्ये
सूर्यकुमार यादव सध्या भारताच्या टी20 संघाचा कर्णधार असून, 2026 च्या टी20 वर्ल्ड कपपूर्वी त्याचा हा जबरदस्त फॉर्म टीम इंडियासाठी मोठी दिलासादायक बाब आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांना जे सातत्य साधता आलं नाही, ते सूर्यकुमार यादवने अचूकतेने आणि ताकदीनं साध्य केलं आहे.